औरंगाबाद - काँग्रेसने
नोटबंदीच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या निदर्शनाचा सोमवारी फज्जा उडाला. तब्बल तीन
तास उशिराने केवळ ५०-६० कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. त्याआधी कार्यक्रमाची वेळ आणि
ठिकाणाबद्दलच काँग्रेस नेत्यांमध्ये संभ्रम असल्याचे समोर आले. काहींनी तर
कार्यक्रम रद्द झाल्याचेही कळवले. यामुळे नोटबंदीच्या निषेधार्थ आयोजित निदर्शने
हा काँग्रेसचा केवळ दिखावा असल्याची चर्चा होती.
औरंगाबाद शहर
आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने नोटबंदीच्या द्विवर्षपूर्तीच्या निषेधार्थ
सोमवारी दुपारी १२ वाजता निदर्शने आयोजित करण्यात आली होती. क्रांतीचौकात आयोजित
या कार्यक्रमाकडे दुपारी १२ ते ३ पर्यंत एकही काँग्रेस नेता किंवा कार्यकर्ता
फिरकला नाही. शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्यासोबत ‘सांजवार्ता ऑनलाईन’ टीमने संपर्क
केला असता त्यांनी कार्यक्रमाची वेळ माध्यमांनीच चुकीची छापल्याचे सांगत सारवासारव
करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार सुभाष झांबड
यांना कार्यक्रमाच्या स्थळाबाबतही माहिती नसल्याचे समोर आले. निदर्शने ही
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार
यांचा मोबाईल मात्र या दरम्यान नॉट रिचेबल येत होता. कार्यक्रमाला मात्र ते हजर
होते. ते म्हणाले, आमच्याकडे दोन कामे शिल्लक करणारी मंडळी जास्त आहेत, त्यामुळे २
ऐवजी १२ ची वेळ माध्यमांना कळवली गेली असण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काँग्रेसच्या
वरिष्ठ नेत्यांमध्येच समन्वय नसल्याचे या प्रकरणावरुन दिसून आले आहे.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता देशाला उद्देशून
केलेल्या भाषाणात ५०० आणि १००० रुपयांची नोट रात्री १२ वाजता पासून चलनातून बाद
होणार असल्याचे जाहीर केले होते. या नोटबंदीमुळे देशभरात १०० पेक्षा जास्त लोकांचा
बळी गेला होता, तर लाखो लोकांचा रोजगार गेला असल्याचा आरोप काँग्रेसचा आहे.
नोटबंदीमुळे देशातील काळापैसा समोर येईल, भ्रष्टाचार, दहशतवाद, नक्षलवाद बंद होईल
असे पंतप्रधान मोदींनी सांगितले होते. यातील एकही आश्वासन खरे ठरलेले नाही, उलट
नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त झाली असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
भाजपचा बुरखा जनतेसमोर फाडण्यासाठी काँग्रेस नेते सोमवारी दुपारी १२ वाजता क्रांतीचौकात निदर्शने करणार होते. मात्र दुपारी तीन पर्यंत येथे एकही कार्यकर्ता किंवा काँग्रेसचे नेते फिरकले नाही, यामुळे या कार्यक्रमाचा फज्जा उडाला. तब्बल तीन तास उशिराने सुरु झालेल्या निदर्शनाला अवघे ५० ते ६० कार्यकर्ते हजर होते. जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, शहर अध्यक्ष नामदेव पवार यांच्या नेतृत्वात ही निदर्शने झाली. आमदार सुभाष झांबड मात्र कार्यक्रमाला अनुपस्थित होते.













